प्रसिद्ध कादंबरीकार , कथालेखक , नाटककार . रणजित देसाई मूळचे कोल्हापूरच्या कोवाडचे. इंग्रजी शाळेत असतानाच त्यांनी लेखनाला सुरुवात केली. कोल्हापूरच्या महाद्वार मधून त्यांनी कथालेखन करायला सुरुवात केली.इंटर नापास असलेल्या देसाई यांनी १९४७ मध्ये प्रसाद मासिकाने आयोजीत केलेल्या कथास्पर्धेत भैरव ही कथा सादर केली. त्यांच्या कथेला पारितोषिक मिळाले. या पारितोषिकामुळे त्यांच्या कथालेखनाला प्रोत्साहन मिळाले.
रुपमहाल (१९५२) , कणंव (१९६०) , जाण (१९६२) , कातळ (१९६५) , गंधाली (१९७१) , कमोदिनी (१९७८) , आलेख (१९७९) , मधुमती (१९८२) , मोरपंखी सावल्या (१९८४) असे अनेक लोकप्रिय कथासंग्रह त्यांनी लिहिले.सामाजिक आशयाच्या , ग्रामीण परिवेशातील त्यांच्या कथांमधून त्यांच्या लेखनाची खास वैशिष्ट्ये जाणवतात. खेडुतांच्या जीवनाचे चांगुलपणा मांडणा-या आकर्षक शैलीतील कथा त्यांनी लिहिल्या. बारी , माझा गाव , या प्रारंभीच्या कादंब-यांनंतर १९६२ मध्ये थोरल्या माधवराव पेशव्यांच्या जीवनावर त्यांनी स्वामी ही कादंबरी लिहिली.या कादंबरीने त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेले. त्यानंतरच्या श्रीमानयोगी या शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या कादंबरीने त्यांची कादंबरीकार म्हणून असलेली लोकप्रियता आधिकच वाढली.ऐतिहासिक वातावरणाचे वैभव आणि व्यक्तीरेखांना दिलेली भावोत्कट उंची यांमुळे त्यांच्या ऐतिहासिक कादंब-यांनी लोकमानस जिंकले.
स्वामीतील माधवराव आणि त्यांची पत्नी रमा तसेच श्रीमानयोगीतील शिवाजी आणि त्यांचे गुरु रामदासस्वामी यांच्या नात्यांना देसाई यांनी वेगळी परिमाणे दिली. लक्ष्यवेध (१९८०) , पावनखिंड (१९८०) , कर्णाच्या जीवनावरील राधेय (१९८६) , राजा रविवर्मा (१९८६) , अशा अनेक ऐतिहासिक पौराणिक कादंब-या लिहून देसाई यांनी या प्रकारच्या कादंब-यांचे युग स्वातंत्र्योत्तर काळात निर्माण केले.गरुडझेप (१९७३) , रामशास्त्री (१९८३) , स्वरसम्राट तानसेन , हे बंध रेशमाचे , कांचनमृग , धन अपुरे , वारसा , स्वामी , आदी नाटकेही त्यांनी लिहिली. नागीण , रंगल्या रात्री अशा , सवाल माझा ऐका या चित्रपटांचे पटकथालेखन , स्नेहधारा , मी एक प्रेक्षक असे लेखसंग्रहही त्यांनी लिहिले.